महाराष्ट्र

maharashtra

भिवंडीतील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून कारवाई करा - पालकमंत्री अस्लम शेख

By

Published : Sep 23, 2020, 3:34 PM IST

भिवंडीतील इमारत दुर्घटनेला अनेक मंत्र्यांपाठोपाठ आज पालकमंत्री अस्लम शेख यांनी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करून त्यांनी मृतकांच्या कुटुंबीयांना काही मदतही जाहीर केली. यासोबतच भिवंडीतील सर्व धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत.

अस्लम शेख
अस्लम शेख

ठाणे - भिवंडीतील पटेल कंपाऊंड परिसरात असलेल्या जिलानी नावाचे तीन मजली इमारत कोसळून आतापर्यंत 39 जणांचा बळी गेला आहे. यानंतर आज वस्त्र उद्योग मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, भिवंडीतील सर्व धोकादायक इमारतींचे नव्याने सर्वेक्षण करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

घटनास्थळावरून पालकमंत्री अस्लम शेखांची प्रतिक्रिया

मागील 60 तासांपासून घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे. या कालावधीत आतापर्यंत ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. तर या सगळ्यांच्या पाठोपाठ आज मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही घटनास्थळाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून चार लाख रुपये आणि एक लाख रुपये मुख्यमंत्री निधीतून देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, कालच मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन भिवंडीतील धोकादायक इमारतीबाबत तातडीने पावले उचलली जातील असे जाहीर केले होते. मात्र, या प्रश्नावर अस्लम शेख यांना विचारले असता त्यांनी याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत अद्यापही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले आहे.

39 जणांचा जीव घेणारा इमारत मालक अद्यापही फरार -

या दुर्घटनेनंतर नारपोली पोलीस ठाण्यात इमारत मालक सय्यद जिलानी यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. आता त्याच्या शोधात पोलिसांची दोन पथके त्याचे मूळ गाव असलेल्या उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कौसडीकर यांनी सांगितले.

हेही वाचा -भारत-चीन सीमावाद : सीमेवर आणखी सैनिक तैनात न करण्यावर दोन्ही देशांचे एकमत


ABOUT THE AUTHOR

...view details