ठाणे- लोकसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार राजन विचारे यांचा तब्बल 4 लाखाहून अधिक मताधिक्यांनी विजय झाला. त्यामुळे विचारे यांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडणार असल्याची चर्चा ठाण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. ठाणे लोकसभेत पुन्हा एकदा भगवा फडकल्याने तसेच राजन विचारे यांना सर्वाधिक मतदान झाल्याने विचारे यांना मंत्रिपद मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.
ठाण्याला केंद्रीय राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता; चर्चेला आले उधाण - महायुती
महायुतीचे विजयी उमेदवार राजन विचारे यांनी ४ लाखांहुन अधिक मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सुरू आहे.
विचारे यांनी तब्बल 4 लाख 12 हजार 151 मतांनी आघाडी घेतल्याने देशात सर्वाधिक मते मिळवणाऱ्या खासदारांपैकी विचारे यांचा पाचवा क्रमांक लागला आहे. त्यामुळेच विचारे यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे. राज्यात युतीच्या खासदारांनी आपले स्थान कायम ठेवत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला धूळ चारली असून मोदी यांचा पुन्हा एकदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या विजयात शिवसेनेचा सिहांचा वाटा असल्याने शिवसेना मंत्रीपद नक्कीच घेणार असे भाकीत वर्तवले जात आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत राजन विचारे आणि आनंद परांजपे यांच्यात चुरस रंगली होती. या निवडणुकीत शिक्षणाच्या मुद्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. मात्र मतदारांनी विचारे यांनाच पसंती देऊन चार लाखापेक्षा अधिक मतांनी विजयी केले,त्यामुळेच देशभरात सर्वाधिक मताधिक्य असलेल्या खासदारांमध्ये विचारे यांचे नाव आहे. याचाच फायदा विचारे यांना होऊ शकतो आणि मंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू शकते असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान शिवसेनेत असलेल्या ज्येष्ठ खासदारांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने नव्या चेहऱ्याना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये मुंबईचे अरविंद सावंत, यवतमाळच्या भावना गवळी, तर रत्नागिरीचे विनायक राऊत हे ज्येष्ठ तसेच दुबार खासदार म्हूणन दिल्लीमध्ये जाणार आहेत. तर ठाणे लोकसभेचे राजन विचारे यांची देखील ही दुसरी टर्म असल्याने राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.