ठाणे -कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याला उल्हासनगर पोलिसांनी आज (गुरुवार) ताब्यात ( Gangster Suresh Pujari Arrested Ulhasnagar Police ) घेतले. सचानंद करिरा उर्फ सचू केबलवाला यांची हत्या आणि उल्हासनगर मधील अनेक व्यापाऱ्याकडून खंडणी प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
विविध पोलीस ठाण्यात ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद - ऑक्टोंबर २०२१ रोजी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपिन्समध्ये मुंबईच्या एटीएस पथकाने अटक केली होती. त्याच्यावर ठाणे व मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात ३७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी विविध पोलीस ठाण्यात प्रक्रिया सुरु आहे. गँगस्टर रवी पुजारी पासून वेगळे होऊन सुरेश पुजारीने ८ ते ९ वर्षांपूर्वी स्वत:ची टोळी निर्माण केली. सुरेश पुजारी हा यापूर्वी उल्हासनगर मधील विश्वास ढाब्यावर नोकरी करत होता. तो घाटकोपर येथील असल्फा व्हिलेज येथे राहात होता. तेथूनच त्याने गुन्हेगारी सुरू केली होती. त्यानंतर नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे, कल्याण, उल्हासनगर येथील डान्सबार मालकांकडे खंडणीचे सत्र सुरु केले होते.