ठाणे - ठाणे खंडणीविरोधी पथकाने कल्याणमधील एका खंडणी प्रकरणामध्ये जेलमध्ये असलेल्या एजाज लकडावाला याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करून पुढील कारवाई ठाणे खंडणी विरोधी पथक करणार आहे. मोक्का न्यायालयात मागील वर्षी केलेल्या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर लकडावाला याला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
दोन कोटी रुपयांच्या खंडणीचे प्रकरण
एका दूध व्यावसायिकाला दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये त्याला ताब्यात घेतले असून त्याची अधिक चौकशी ठाणे पोलीस करत आहेत.
कोण आहे लकडवाला?
दाऊद इब्राहिमचा हस्तक लकडावाला याच्यावर जवळपास 25 गुन्हे दाखल असून खंडणी, हत्या असे अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. लकडावाला जोगेश्वरी येथील शाळेतून शिकलेला आहे. 2004साली छोटा शकील याच्याशी संबंध असल्याच्या आरोपाने छोटा राजन याने एजाजवर हल्ला केला होता. त्याने डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्यासोबत काम केलेले आहे. 93साली त्याच्यावरती पहिला खुनाचा गुन्हा दाखल झाला. मुंबईमध्ये शिक्षण घेतलेला इजाज कालांतराने गुन्हेगारी टोळ्यांसाठी काम करू लागला. त्यानंतर दाऊद आणि छोटा शकील यांच्यासह छोटा राजन यांच्या संपर्कातदेखील तो आला. मागील वर्षी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आढळल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर त्याला आज मोक्का न्यायालयाच्या मान्यतेनंतर ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
इजाजसोबत त्याचा भाऊही आरोपी
इजाज लकडावाला याच्यासोबत या गुन्ह्यात त्याचा चुलत भाऊ नदीम लकडावाला याचादेखील कल्याण खंडणी प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आता त्याच्यावरदेखील कारवाई होणार आहे.
अशी होती पद्धत
एजाजला मोठ-मोठ्या बिल्डरांचे फोन नंबर्स काढून दिले जात होते. त्यानंतर एजाज त्यांना फोन करून मेसेज पाठवून इंटरनेट कॉल र धमकवायचा आणि खंडणी गोळा करायचा. या प्रकारचे अनेक गुन्हे त्याच्यावर मुंबई ठाणे परिसरात दाखल आहेत.