ठाणे -मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथील पुलाखाली ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात बायकोनेच स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून नवऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नारपोली पोलिसांनी कालच पत्नीसह तिचा प्रियकर व मैत्रिणाला अटक केली असून त्यापाठोपाठ भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला गजाआड केले. प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी (वय 32, रा. कणेरी), प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय 28, रा. भादवड), मैत्रीण प्रिया सुहास निकम (32, रा. वेताळपाडा) या आरोपींना कालच अटक केली होती. तर संतोष गुरु रेड्डी (वय 26, रा. गायत्रीनगर, भिवंडी) असे सुपारी घेऊन हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चार लाखात पतीच्या हत्येचा सौदा
श्रुती हिने प्रियकर नितेश वालासोबत विवाह करण्यासाठी आपल्या पतीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकमला दिली. तिने पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्या ओळखीचा सुपारी घेऊन हत्या करणारा गुन्हेगार संतोष रेड्डी असल्याचे सांगितले. त्यानंतर ४ लाख रुपयांत पती प्रभाकरच्या हत्येचा सौदा केला. त्यासाठी आरोपी पत्नी श्रुतीने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून एक लाख रुपये अॅडव्हान्स हत्या करणाऱ्या संतोषला दिले होते.