ठाणे- कल्याणमधून 21 ऑक्टोबरपासून राजीव ओमप्रकाश बीडलान (25, रा. बेतुरकरपाडा, कल्याण) हा तरुण बेपत्ता झाला होता. गुरुवारी त्याच्या मृतदेहाचा सांगाडा भिवंडी तालुक्यातील वाळसिंद येथील मुंबई पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडुपात सापडल्याने खूनाचा उलगडा झाला. या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राजीवच्या ४ मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.
हेही वाचा -मुलाच्या वाढदिवसावरून वाद; पत्नीने पतीच्या डोक्यात फ्राय पॅन मारून सुरीने केले वार
राहुल रमेश लोट (22, रा. मारूती नगर, दिवा-पूर्व) आणि संदीप उर्फ बाळा हरिश्चंद्र गौतम (27, रा. गरिबाचा वाडा, डोंबिवली-पश्चिम), अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासोबतच पुन्हा एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजीवचा काटा काढणारा मुख्य सूत्रधाराला देखील ताब्यात घेण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजीव बीडलान याचे एका महिलेसोबत संबंध जुळले होते. त्यानंतर ती महिला आणि राजीव हे दोघेही बाहेरगावी पळून गेल्यानंतर 2 महिन्यांनी कल्याणमध्ये परतले आणि एकत्र राहू लागले. हा प्रकार त्या महिलेच्या पतीला समजला. तेव्हापासूनच त्याने राजीवचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.
हेही वाचा -घरात घुसुन तरुणाचा महिलेवर चाकूहल्ला, अत्याचार करण्याचाही प्रयत्न
21 ऑक्टोबरला त्या महिलेच्या पतीने तिचा सावत्र भाऊ आणि मित्र राहुल लोट यांच्या मदतीने राजीवला दारू पाजली आणि एमएच 05 सीजी 5796 या क्रमांकाच्या रिक्षातून भिवंडीतील वाळसिंद येथील मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ आणले. तेथे मुख्य सुत्रधाराने त्याच्या साथीदारांच्या मदतीने राजीवच्या छातीत हत्यार खुपसून त्याचा खून केला. त्यानंतर राजीवचा मृतदेह जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडुपात फेकून आरोपींनी तेथून पळ काढला. महात्मा फुले चौक पोलिसांनी अत्यंत किचकट स्वरुपाच्या या गुन्ह्याचा छडा लावून राजीवच्या चारही मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या चौघांना शनिवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.