ठाणे -भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील वंजारपट्टी नाका ते चाविंद्रा मार्गावरील पटेलनगर परिसरातील निष्कृष्ट रस्ते अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहेत. या मार्गावर काँक्रिटीकरणाचा रस्ता अरुंद असल्याने लगतच पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. यामुळे एकच ठिकाणी चार दुचाकी चालकांचा अपघात झाला आहे. विशेष म्हणजे या चारही अपघाताच्या घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. दुसरीकडे दरदिवशीच या ठिकाणी अपघात होत असल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन वाहने चालवत आहेत. मात्र भिवंडी पालिका प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अपघातग्रस्त नागरिकांनी केला आहे.
गॅपमुळे अपघाताची मालिका
भिवंडी शहरातील पटेलनगर परिसरात काही वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिटीकरणाचा रस्ता बनविण्यात आला. मात्र हा रस्ता अरुंद असल्याने लगतच पेवर ब्लॉक बसवण्यात आले आहे. यामुळे रस्त्यांमध्ये चढ-उतार होऊन गॅप तयार झाला आहे. याच रस्त्यावर पडललेल्या गॅपमुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचा घसरून अपघात होत आहे. ही अपघाताची मालिका रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा पालिका प्रशासनाकडे तक्रारीदेखील केल्या. मात्र महानगरपालिकेने याकडे अक्षरशः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.