ठाणे : कोरोनाच्या पाश्वभूमीवर सुरु केलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका राज्यासह देशातील सर्वच आदिवासी बांधवांना बसला आहे. मात्र, पावसामुळे आदिवासी बांधवांना रानभाज्यांचा मोठा आधार मिळत आहे. या भाज्या खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होत असल्याने कोरोनाविरुद्धच्या लढाईत त्यांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. विशेष म्हणजे मान्सूनपूर्व पावसामुळे रानभाज्यांच्या वाढीला पोषक वातावरण तयार झाले असून या भाज्यांची बाजारातील आवक वाढली आहे. नागरिकही या भाज्या मोठ्या प्रमाणावर खरेदी करताना दिसत असून स्थानिक आदिवासी महिलांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.
भिवंडी तालुक्यातील अलकोळी गावातील आदिवासी बांधवांवरचे लॉकडाऊनमुळे होत असलेल्या उपासमारीचे संकट दूर होत असून गावातील आदिवासी कुटूंब टोपली, पहार, विळा घेऊन रानभाज्या आणण्यासाठी नजिकच्या जंगलात जात आहेत.
हेही वाचा...तामिळनाडूचे हुतात्मा जवान के. पलानी यांच्या पार्थिवावर झाले अंत्यसंस्कार
आदिवासी महिलांसह सहबांधव खोदकाम करून जमिनीतील कंद काढताना दिसत आहे. तसेच कोलभाजी, बाफनी, शेवळे, गिडवाड, धिंड, तेलपाट, फोईफूड, केळबोड, हाळीव, कोशमा, हाळीदसह विविध रान भाज्या मोठ्या प्रमाणात गोळा करता. त्यानंतर या भाज्य शहरी भागात तर काही वेळा महामार्गाच्या बाजूला त्या रानभाज्यांची, कंदमुळाची विक्री करून घरात लागणारे तेल, मीठ, मसाला आदी चीजवस्तू खरेदी करत आहेत.
मानवी शरीरासाठी लागणाऱ्या प्रोटीनयुक्त आणि रोग प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या रान भाज्यांची शहरात मोठी मागणी असते. या रानभाज्या पावसाळा सुरु झाल्यावर केवळ जंगलात मिळतात. यावर आपला आणि आपल्या कुटुंबीयांचा उदाहरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी बांधवांना मोठी मेहनत करावी लागत आहे. या रानभाज्यांमध्ये लोह, खनिज, प्रथिने आदी पोषक गुणधर्म असल्याने आहारात त्यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.