ठाणे-शहरात मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या धो-धो पावसाने रविवारी रात्री पासून विश्रांती घेतली आहे. मात्र, अनधिकृत बेकायदेशीर आणि नियोजन शून्य बांधकामामुळे अजूनही अनेक ठिकाणी पाणी ओसरलेले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.
ठाणे मनपा हद्दीतील कळवा येथील पारसिक नगर मधील श्री जी धाम आणि श्री जी सोसायटीमध्ये गेल्या ४-५ दिवसांपासून पावसाचे पाणीच ओसरलेले नाही. कारण या सोसायटी मधील पाण्याचा निचरा होणाऱ्या पाईप लाईन जवळच असलेल्या नॅशनल हायवे डागडुजीमध्ये चोकअप झाल्या आहेत. यामुळे या सोसायट्यांमध्ये २ ते ३ फूट पावसाचे पाणी साचून आहे. जर सोमवारी संध्याकाळपर्यंत हे पाणी काढले गेले नाही तर ज्या नॅशनल हायवेमुळे हे पाणी तुंबले आहे, तो नॅशनल हायवे मी खोदून टाकेन, असा इशारा स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.