ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज पुन्हा भिवंडी-कल्याण रस्त्यावरील आस बीबी परिसरात असलेल्या एका सायजींग-डाईंग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. याठिकाणी विविध कच्च्या कापडावर प्रक्रिया करून पक्का केला जातो. मात्र, आज सायंकाळी साडेचारच्या सुमाराला अचानक कारखान्यात आग लागली. आगीची माहिती मिळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर पळ काढला.
भिवंडीत अग्नीतांडव सुरूच; सायजींग-डाईंग कारखान्याला भीषण आग
भिवंडी शहरातील आस बीबी परिसरातील रुंगटा सायजिंगला भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अजूनही कळू शकलेले नाही.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी, कल्याण, ठाणे अग्निमशन दलाच्या ६ गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग कारखान्यात साठवून ठेवलेल्या कपड्याच्या गठ्ठे आणि केमिकल साठ्यांमुळे अधिकच भडकल्याने आगीने रौद्ररूप धारण केले आहे.
आतापर्यंत लाखोंचे कापड व मशीनरी जळून खाक झाल्या आहेत. या आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांना त्या धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी भिवंडी शहर पोलीस दाखल असून ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या आगीमुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.