ठाणे - उल्हासनगर कॅम्प ४ नंबर परिसरात असलेल्या एका खाजगी गृहसंकुलात महापालिका निधीतून बांधण्यात येत असलेल्या उद्यानाला विरोध करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी व ठेकेदार अजय सेवानी यांच्यात धक्काबुक्की व हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे खाजगी गृहसंकुलाच्या आवरता महापालिकेने उद्यान बनविण्यासाठी निधी दिलाच कसा? असा प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे.
पालिकेच्या निधीवरून ठेकेदार व तक्रादार महिलांमध्ये हाणामारी १० लाखाचा निधी महापालिकेला मंजूर केलाच कसा ?
उल्हासनगर कॅम्प नं-४ ओटी सेक्शन परिसरातील एका खाजगी गृहसंकुलात चार इमारती असून एका इमारतीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी तर दुसऱ्या इमारतीमध्ये ठेकेदार अजय सेवानी राहतात. गृहसंकुलाच्या खुल्या जागेवर उद्यान - बाग बांधण्याची मागणी गृहासंकुलातील नागरिकांनी महापालिकेकडे केली होती. त्यानुसार महापालिकेने छोटे उद्यान बांधण्यासाठी १० लाखाच्या निधीला मंजुरी दिल्यावर, उद्यान बांधण्याचे काम ठेकेदार सेवानी यांना मिळाले, यानंतर त्यांनी उदयनाचे काम सुरू केले. या दरम्यान सरिता खानचंदानी यांनी उद्यान बाबत महापालिकेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवून त्या बाबत पाठपुरावा केला. मात्र त्यांना अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही. दुसरीकडे शहरातील विकास कामासाठी महापालिकेकडे निधी नसतांना, खाजगी गृहसंकुलात उद्यान बांधण्याला १० लाखाचा निधी दिलाच कसा? असा प्रश्न खानचंदानी यांनी केला.
मोबाईल चित्रीकरणसह सीसीटीव्ही फुटेजमुळे घटना उघडकीस -
सामाजिक कार्यकर्त्या सरिता खानचंदानी या शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजता मोबाईलवर परिसराची रेकॉर्डिंग करीत होत्या. त्यावेळी उपस्थित असलेल्या ठेकेदार अजय सेवानी यांच्यासोबत वाद होऊन दोघात धक्काबुक्की झाली. दोघांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन एकमेकां विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून दोघांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हेया थोरात यांनी दिली. मात्र ठेकेदाराने एका महिलेला धक्काबुक्की करण्याच्या प्रकारचा सर्वस्तरातून निषेध होत असून महापालिका कारभारावर झोड उठली आहे.