ठाणे -उल्हासनगर शहरातील मटका किंगवर कारमधून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार तसेच लोखंडी रॉडने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात २ अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संदीप गायकवाड असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारात जखमी झालेला संदीप गायकवाड हा उल्हासनगर कॅम्प नंबर ३ मधील सचदेव नगर परिरात राहतो.बुधवारी रात्री ११ वाजल्याच्या सुमारास उल्हासनगरमधील श्रीराम चौकातील बारमधून संदीप व त्याचा मित्र जहागीर मोरे हे दोघे बाहेर पडले. त्यानंतर रस्त्यावरून जात असतानाच कार मधून दोन हल्लेखोर आले. त्यांनी अचानक संदीपवर गोळीबार केला. तर दुसऱ्याने लोखंडी रॉडने हल्ला केला. यावेळी पोलीस व्हॅन याच रस्त्याने जात होती. त्यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस व्हॅनने त्या अज्ञात हल्लेखोरांच्या कारचा पाठलाग केला. मात्र, हल्लेखोर पोलिसांना गुंगारा देत कार सोडून पळून गेले. या घटनेत संदीप गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.