ठाणे -उच्च विद्युत दाबाच्या लगतच असलेल्या दोन विद्युत वाहिनींचा एकमेकांशी अचानक संपर्क झाल्याने खांबामध्ये मोठा स्फोट होऊन गावातील अनेक वीज मीटरसह विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहे. तर या दुर्घटनेमुळे वीज मीटरमध्ये लागलेली आग घरात पसरून त्यामध्ये एक वयोवृद्ध महिला गंभीर भाजल्याचे समोर आले आहे.
अनेक घरातील विद्युत उपकरणे जळून खाक
भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत जु पाडा गावात काल रात्रीच्या सुमारास अचानक शॉकसर्किट झाला. त्यामुळे गावातील टोरेंट पॉवर कंपनीचे १५ ते २० मीटर जळाले तर काही ठिकाणी आग लागली. या आगीत एक महिला भाजली असून घरातील मीटर जळून खाक झाले आहेत. त्यासोबतच अनेक घरातील विद्युत उपकरणे टीव्ही, फ्रिज आणि इतर साहित्य जळाल्याने स्थानिक रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.
रात्रीपासून जु पाडा गावातील बत्तीगुल
जु पाडा गावातून उच्च दाबाची विद्युत वहिनी गेली असून या केबलचा संपर्क टोरेंट कंपनीच्या खांब्याशी आल्याने मोठा स्फोट होऊन गावातील अनेक मीटर जळाले. तर टीव्ही, फ्रिजसह आदी उपकरणे जळून खाक झाली. तसेच गावातील काही घरांमध्ये आग लागून एक महिला जखमी झाली आहे. या दुर्घटनेत नुकसान झालेल्यांना नुकसानभरपाई टोरेंट पॉवर कंपनीने द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून या घटनेनंतर रात्रीपासून जु पाडा गावातील बत्ती गुल झाली आहे.