ठाणे -भिवंडी निजामपूर महापालिकेतील एका मृत कर्मचाऱ्याची प्रलंबित रक्कम मिळवून देण्यासाठी लाच मागणारा भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील प्रभारी कर्मचाऱ्याला ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून अलगद जाळ्यात अडकवले आहे. आनंद जगताप असे लाचप्रकरणी रंगेहात ताब्यात घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
५ हजारांची मागणी करून ४ हजारांवर केली तडजोड
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी निजामपूर महापालिका सेवेतील कर्मचारी सिद्धार्थ मारुती घाडगे यांचे 29 मे 2021 रोजी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती अस्मिता यांनी भिवंडी महापालिका भविष्य निर्वाह निधी कार्यालयात अर्ज करून मृत पतीच्या नावे जमा असलेली ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, गट विमा व रजेचा पगार ही रक्कम मिळणेबाबत अर्ज केला होता. अर्ज दाखल केल्यानंतर पालिकेच्या जुन्या मुख्यालय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या भविष्यनिर्वाह निधी विभागात वारंवार फेऱ्या मारूनही अर्जावर कार्यवाही होत नव्हती. त्यातच विभागातील प्रभारी कर्मचारी आनंद जगताप याने मृत कर्मचाऱ्याचा भाऊ राहुल घाडगे यांच्याकडे धनादेश काढून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली असता तडजोडी अंती ४ हजार देण्याचे मृत कर्मचाऱ्याचा भाऊ राहुलने मान्य केले.
कार्यलयातच लाच घेताना अडकला सापळ्यात
आनंद जगताप या कर्मचाऱ्याविरोधात लाच मागितल्याप्रकरणी राहुल घाडगे यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागात रीतसर लेखी तक्रार केली दिली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पळताळणी करून लाचलुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारच्या सुमारास महापालिकेच्या जुन्या मुख्यालय इमारतीमधील पहिल्या मजल्यावर असलेल्या भविष्य निर्वाह निधी विभागात सापळा रचला होता. या सापळ्यावेळी कर्मचारी आनंद जगताप चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या प्रकरणी जबाब नोंदविला जात असून त्यानंतर निजामपूर पोलीस ठाण्यात लाचखोर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार असल्याची माहिती, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.