ठाणे- कोरोनाच्या महामारीमुळे टाळेबंदी काळात गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली असतानाच, भरमसाट आलेल्या वीज बिलांनी त्यांच्या समोर कोणतीच आशा उरलेली नाही. टाळेबंदी पूर्वी महिना सातशे ते आठशे रुपये येणारी बिले एकदम हजारात येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाण्यात एका आजींना तर आता विज बिलांमुळे लाईट लावण्याचीही भीती वाटते. त्यामुळे दिवसभर उजेडात काम करून रात्री मेनबत्ती लावून त्यांना काम करावे लागत आहे.
निराधार प्राण्यांची माय अंधारात; भरमसाट बिलाने लाईट लावण्याचीही आजींना भीती
टाळेबंदी पूर्वी महिना सातशे ते आठशे रुपये येणारी बिले एकदम हजारात येऊ लागल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ठाण्यात एका आजींना तर आता विज बिलांमुळे लाईट लावण्याचीही भीती वाटते. त्यामुळे दिवसभर उजेडात काम करून रात्री मेनबत्ती लावून त्यांना काम करावे लागत आहे.
लक्ष्मी सूर्यवंशी नामक वृद्ध महिला आपल्या लेकीसोबत राहत असून अनेक निराधार आणि भटक्या प्राण्यांचाही देखभाल त्या करत आहेत. सदर महिलेकडे अनेक जखमी श्वान, मांजरे आणि पक्षी आहेत. घासातला घास काढून आणि इतर दानशूर व्यक्तींच्या मदतीने त्या हा सर्व गाडा ओढत आहेत. परंतु, टाळेबंदीमुळे त्यांना चक्क दहा हजारांचे वीजबील आल्याने ते कसे भरावे, असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. जनतेची ही व्यथा पाहता राज्यातील ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज संपूर्ण राज्यात निषेध मोर्चे काढण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, सरकारने दडपशाहीचे तंत्र वापरून हे आंदोलन मोडून काढले. सरकार आणि ऊर्जामंत्र्यांनी सामान्य नागरिकांचा हा त्रास समजून घेऊन उपाययोजना करावी, असे अस्वस्थ आवाहन मनसे नेता महेश कदम यांनी केले.
आजीचे कुटुंब हे त्यांच्या घरात असलेली प्राणी
आजी बाईंच्या मुलाचे निधन झाले असून त्या आपल्या मुलीसोबत राहतात. रस्त्यावरील कुत्री-मांजरीना कोणीही मारत असते, गाडीखाली येऊन त्यांचे अपघात होतात म्हणून प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईंनी आपल्या घरात १० कुत्री, सात मांजरीना आश्रय दिला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या आजीबाई गेली दोन महिने अंधारात राहत आहेत. वाढीव बिलाची आजींना एवढी दहशद झाली आहे की, लाईट लावायची मला भीती वाटते असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.