ठाणे -गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेमधील बंडखोरीने राज्यातील ठाकरे सरकार अस्थिर होऊन राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. त्यातच कल्याण पूर्वेतील २०१४ च्या शिवसेनेच्या जाहीर सभेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाकडून शिवसैनिकांना होणाऱ्या वेदना, अन्याय व अत्याचार विरोधात भावनिक आव्हान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा पत्र दिले होते. त्यावेळी भाजप - शिवसेना सत्तेत असताना शिंदेंचे राजीनामा नाट्य घडले होते. मात्र आजच्या घडीला शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे आता त्या सभेतील राजीनामा नाट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला आहे. ( Eknath Shinde Old Video Viral )
व्हिडिओ व्हायरल - व्हायरल व्हिडिओमध्ये मंत्री शिंदे बोलतात कि, गेल्या अनेक महिन्यापासून शिवसैनिकांवर भाजपकडून अन्याय सुरु आहे. हे मी उघड्या डोळ्याने पाहूच शकत नाही. त्यामुळे कॅबिनेटमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसूच शकत नाही. कारण आदी शिवसैनिक आहे. त्यानंतर मंत्री आहे. मला शिवसैनिकांच्या वेदना पाहवत नाही. त्यामुळे मी पालकमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले. तसेच भाषण संपताच राजीनामा पत्र घेऊन सभेच्या व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र दिले. त्यावेळी आदित्य ठाकरेही सभेत उपस्थितीत असल्याचे या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.