ठाणे -'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकावरून सध्या वादंग निर्माण झाला असून ठाण्यातील मराठा आणि बहुजन समाजाच्या नेत्यांनी देखील या पुस्तकाच्या विरोधात दंड थोपटले आहेत. हे पुस्तक कोणत्याही ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात येऊ नये, जर असे झाल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच या नेत्यांनी दिला आहे. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले असून मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या पत्रात त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यामळे या पुस्तकावरून येत्या काही काळात ठाण्यात देखील वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकावरून ठाण्यातील मराठा नेते आक्रमक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकावरून वाद सुरू आहे. या पुस्तकावर सगळ्यांनीच टीका केली असून, पुस्तकावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार आणि कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत आपली नापसंती दर्शवत पुस्तक बाजारात येऊ देऊ नये, अशी मागणी केली आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे. “पंतप्रधान मोदींनी सात जन्म घेतले, तरी शिवाजी महाराजांच्या एका क्षणाचीही बरोबरी त्यांना करता येणार नाही,” अशी टीका कडू यांनी केली आहे. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाविषयी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ट्विटरवरून भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊ शकत नाही. सात जन्म नाही, सात पिढ्या नाही, तर अख्खे आयुष्य झिजवले, तरी मोदींची तुलना छत्रपतींशी करू शकत नाही. छत्रपतींच्या आयुष्यातील एक प्रसंगासारखा देखील संघर्ष मोदींनी केलेला नाही अशी टीका देखील बच्चू कडू यांनी केली आहे.
हे वादाचे हे लोण आता ठाण्यात देखील सुरू झाले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हा मुद्दा उचलण्यात असून यामुळे वातारण चांगलेच तापले आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले असून या पत्रामध्ये त्यांनी या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना नरेंद्र मोदी यांच्या सोबत करणे म्हणजे हा केवळ अपराधच नव्हे तर, महाराष्टाची माती कलंकित करण्यासारखी असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या सर्व घडामोडीनंतर ठाण्यात देखील या पुस्तकावरून वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.