ठाणे - राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांची स्थलांतराची समस्या जिथे होती तिथेच आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या तकलादू उपाययोजना देखील या समस्येला मुळासकट उपटून फेकू शकलेल्या नाहीत. त्यातच ठाणे जिल्ह्यातील स्थलांतरीतांची समस्या जितकी बिकट आहे. तितकीच त्यांच्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण हक्काची समस्या वर्षानुवर्षे बिकट बनू लागली आहे. मार्च २०२१मध्ये जिल्ह्यात तब्बल ३२३ स्थलांतरीतांची शाळाबाह्य बालके आढळून आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी शाळाच बंद असल्याने सलग दुसऱ्यावर्षी ३१९ बालकांचा शाळा प्रवेश निव्वळ कागदावरच राहिला आहे. तशातच यातील ४ बालकांचे पुन्हा थेट जिल्ह्याबाहेर स्थलांतरदेखील झाल्याचे शिक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये उघडकीस आले आहे.
शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी विशेष मोहीम -
रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी मार्च २०२१मध्ये संपूर्ण ठाणे जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन १९ मार्च २०२१पासून त्यांच्या शैक्षणिक उपाययोजनांची कार्यवाही सुरू करण्यात आली होती. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, ठाणे या तालुक्यात स्थलांतरीत कुटूंबांचा शोध घेण्यात आला होता. त्यात १हजार ५३४ बालके स्थलांतरीत होऊन गेली आहेत. पैकी जिल्ह्यातंर्गत १ हजार ०९१ बालके तर जिल्ह्याबाहेर २१५ व राज्याबाहेर २२८ बालकांचे स्थलांतर झाले आहे. यामध्ये विशेष गरजाधिष्टीत ५ बालकांचा देखील समावेश आहे. २ हजार २५९ बालके स्थलांतरीत होऊन आली आहेत. त्यात जिल्ह्यातंर्गत ९६८ तर बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल बालके १ हजार ००२ व राज्याच्या बाहेरुन २८९ बालके मिळून आली आहेत. यात २ बालके विशेष गरजाधिष्टीत आहेत.