ठाणे - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेत देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. राज्यातदेखील संचारबंदी आणि जमावबंदी लागू आहे. तरीही काही नागरिक कोरोनाचे गांभीर्य लक्षात न घेता, विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत. तसेच काहीवेळा घोळका करून फिरताना दिसत आहे. त्यामुळेच आता भिवंडी पोलिसांनी शहरात ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर नजर ठेवून कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडीत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर आता 'ड्रोन'ची नजर हेही वाचा...डोंबिवलीतील 46 वर्षीय महिलेचा कोरोनासदृश्य आजाराने मृत्यू
यंत्रमाग नगरीसह कामगाराचे शहर म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. या शहरात देशभरातील विविध राज्यातील लाखो कामगार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वास्तव्य करत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असतानाही असंख्य नागरिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करताना दिसतात. हीच गर्दी पांगवण्यासाठी भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनाकारण रस्त्यावर दिसणाऱ्यांना नागरिकांना फटकावण्यासह उठाबशा काढण्याची शिक्षा करण्याचे आदेश दिले होते.
यानंतर आता गल्लीबोळांसह मुख्य रस्त्यापासून आत असणाऱ्या रस्त्यांवर नागरिकांची होणारी गर्दीची ठिकाणे शोधण्यासाठी पोलीस ड्रोन कॅमेराची मदत घेत आहे. आज (बुधवार) शहरात या कारवाईला सुरवात झाली आहे. या कारवाईमुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये चांगलीच दहशत बसली असून नागरिक आता गल्लीबोळातही गर्दी करण्याचे टाळत आहेत.