ठाणे - आम्ही पैशांचा पाऊस पाडतो. तुम्ही ५६ लाख रुपये तयार ठेवाल, तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पाडून दाखवू,’ असे भोंदूबाबासह पाच जणांच्या टोळक्याने डोंबिवलीतील ( Dombivali ) एका बांधकाम विकासकाचे पूजेत ठेवलेले ५६ लाख घेऊन पसार झाले होते. टोळीतील भोंदूबाबासह तीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ( Manpada police ) बेड्या ठोकल्या आहेत. अशोक गायकवाड, रमेश मोकळे, आणि भोंदूबाबा महेश गुरुजी असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर शर्मा आणि गणेश हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आरोपी टोळीने चमत्कारी बाबा असल्याचे भासवले -सुरेंद्र पांडुरंग पाटील ( वय - ५१, रा. चोळेगाव, ठाकुर्ली ) हे बांधकाम विकासक आहेत. त्यांचे डोंबिवली पूर्वेकडील दावडी येथील पाटीदार भवन शेजारी श्री एकविरा स्वप्ननगरी इमारत येथे कार्यालय आहे. तेथे जवळच निवासाचीही व्यवस्था आहे. गेल्या महिन्यात विकासक सुरेंद्र पाटील यांना महेश या भोंदूबाबाने संपर्क करून, आपल्याकडे पैशाचा पाऊस पाडणारी काही चमत्कारी बाबा असल्याचे सांगितले होते. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन आपण नोटाचा पाऊस पाडून घेण्यास इच्छुक असल्याचे पाटील यांनी आरोपी महेशला सांगितले होते. त्यानंतर आरोपी महेशने भोंदूबाबा असलेल्या ठाण्यातील अशोक शंकर गायकवाड याच्याशी पाटील यांची ओळख करून दिली. त्यामुळे भोंदूबाबा अशोक नियमित पाटील यांच्या कार्यालयात येत होता. अशोकने आपला परिचित चमत्कारी बाबा रमेश मोकळे ( रा. कसारा ) हे पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगून आरोपी गणेश यासाठी मदत करतील असे सांगितले होते. त्यानंतर गणेश या ढोंगी बुवाने पाटील यांना ५६ लाख रुपये पूजेसाठी खर्च केले, तर ५० कोटी रुपये नोटांचा पाऊस पडेल, असे सांगितले.
पूजेसाठी दागिने गहाण ठेवून आणली होती रक्कम -पाटील यांनी या टोळक्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. ५६ लाख रुपयांची तजवीज करण्यासाठी घरातील सोने कल्याणमधील पारस जवाहिऱ्याकडे पाटील यांनी गहाण ठेवले. तर ठरवलेल्या प्रमाणे आरोपी गणेश धार्मिक विधी करणार होता. त्यामुळे आरोपी गणेशने पूजा साहित्याची यादी पाटील यांना दिली.