ठाणे - शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनपट असलेला ‘धर्मवीर’ हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. मात्र त्यांनी लहान मुलांसाठी वाचविले उद्यान गेल्या 18 वर्षांपासून बंद असल्याचे समोर आले आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने विकसित केलेले हे उद्यान लहान मुलांसाठी खुले करावे, या मागणीसाठी मनसेचे संतोष निकम यांनी सुमारे 45 वेळा ठाणे महानगर पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, त्याकडे पालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
ठाण्यातील वर्तक नगर येथील इमारत क्रमांक ५४, ५५ दरम्यान उद्यानासाठी राखीव असलेल्या भूखंडावर काही गावगुंडांनी अतिक्रमण केले होते. ही बाब आनंद दिघे यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा भूखंड वाचवून त्या ठिकाणी मुलांसाठी उद्यान विकसित करण्याचे आदेश दिले होते. आनंद दिघे यांच्या निधनानंतर सन 2015 मध्ये या भूखंडावर १ कोटी रुपये खर्च करुन उद्यान विकसित करण्यात आले. या मैदानाला ‘धर्मवीर आनंद दिघे‘ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे संतोष निकम यांनी लावून धरली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे १९ जुलै २०१८ रोजी या उद्यानाला आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव पारित करण्यात आला. मात्र, या उद्यानाचे लोकार्पण करण्यात आलेले नाही. या उद्यानाचे लोकार्पण करावे, या मागणीची सुमारे ४५ स्मरणपत्रे नागरिकांनी ठाणे प्रशासनाला दिली आहेत. तरीही, शिवसेनेची सत्ता असलेल्या मनपाने या उद्यानाचे लोकार्पण केलेले नाही. परिणामी, कोट्यवधी रुपये खर्च करुनही हे उद्यान अडगळीत पडले आहे.