ठाणे - आपल्याशी साखरपुडा करून लग्न न करता दुसऱ्या तरुणाशी लग्न केल्याच्या वादातून तरुणाने लग्न मोडणाऱ्या विवाहितेचा बदनामीकारक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. शिवाय विवाहितेला व तिच्या पतीला ठार मारण्याची धमकी देऊन १० लाख रुपये खंडणीचीही मागणी केली आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशोक ढाका असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यात रहिवाशी आहे.
व्यसनी असल्याने मोडलं लग्न
या घटनेतील २६ वर्षीय तक्रारदार कल्याण पश्चिम भागात राहतो. त्याचे लग्न सन २०१७ मध्ये एका तरुणीशी झाले. मात्र या तरुणीचे लग्न होण्याआगोदर तिचे लग्न सन २०१५ मध्ये राजस्थान राज्यातील गावाकडे राहणाऱ्या अशोकशी ठरले होते. परंतु चौकशी केल्यानंतर तरूणीच्या घरच्यांना लग्न जमलेला तरुण व्यसनी आहे, तो सर्व प्रकारची व्यसने करतो व कोणतेही काम करत नाही. तसेच कोणाशीही वाद घालतो. त्यामुळे त्याच्या घरचे लोकही त्याला कंटाळले आहेत. त्यामुळे त्याचवेळी तरुणीने लग्न मोडले होते.