ठाणे -बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील अप रेल्वेमार्गावर एका व्यक्तीचे मुंडके रेल्वे रुळावर पडलेले मीळाले, तर त्या व्यक्तीचे धड नाल्यात सापडल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बदलापूर लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
धक्कादायक ! मोटारमनला फक्त शीर दिसले रुळावर - railway track
चेन्नई एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना मोटरमनला रुळावर एक शीर दिसले. त्यांनी या घटनेची माहिती त्वरित बदलापूर रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अनोळखी व्यक्तीचे शीर ताब्यात घेतले.
चेन्नई एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात असताना मोटरमनला रुळावर एक शीर दिसले. त्यांनी या घटनेची खबर त्वरित बदलापूर रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन ते अनोळखी व्यक्तीचे शीर ताब्यात घेतले. मात्र, घटनास्थळी त्या व्यक्तीचे धड सापडले नव्हते. एकंदरीतच हा रेल्वे अपघाताचा प्रकार आहे की कोणी त्याला ठार मारून त्याचे शीर रेल्वे रुळावर आणून टाकले आहे का? असा प्रश्न पोलिसांना पडला होता. ज्या ठिकाणी शीर आढळून आले, त्या ठिकाणी रेल्वे रुळाखाली नाला असल्यामुळे कदाचित लोकल गाडीच्या धडकेत त्याचे धड नाल्यात पडून शीर रेल्वे रुळावर राहिले असावे असा अंदाज पोलिसांनी लावला, आणि नाल्यात धडाचा शोध घेण्याचे ठरवले. मुसळधार पाऊस असल्यामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह वाहता असल्याने धड दिसत नव्हते. यामुळे रेल्वे पोलिसांनी बदलापूर अग्निशामक दलाच्या जवानांना या घटनेची खबर देऊन घटनास्थळी बोलावले.
अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर भागवत सोनवणे, लेडींग फायरमन प्रदीप जाधव मदतनीस दिलीप गवळी, बळीराम बोराडे, गणेश धुळे या अग्निशामक दलाच्या जवानांनी नाल्यामध्ये शोध घेऊन अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर नाल्यातील एका कोपर्यात अडकलेल्या धडाला त्या ठिकाणाहून बाहेर काढले. हा मृतदेह तीस ते पस्तीस वयोगटातील व्यक्तीचे असून त्याची ओळख पटली नव्हती. दरम्यान त्याने आत्महत्या केली आहे, की धावत्या गाडी खाली सापडून त्याचा मृत्यू झाला आहे. याचे कारण अद्याप पोलिसांना समजलेले नाही अधिक तपास पोलीस करत आहेत.