ठाणे -ठाण्याच्या घोडबंदर रोडवर बिबट्याचे दर्शन रात्रीच्या अंधारात होत होते. मात्र, घोडबंदर रोडवरील कासारवडवली परिसरात शनिवारी चक्क दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन घडले आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाचे पथक, वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन पथक आणि कासारवडवली पोलीस यांनी संयुक्तरित्या बिबट्याचा शोध घेतला. मात्र, चार तासांच्या परिश्रमानंतर अखेर शोध पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. वनविभाग आणि पोलिसांनी मात्र स्थानिकांना बिबट्यापासून संरक्षणाचे धडे देत जनजागृती केली.
हेही वाचा -Fire Broke Out in Warehouse : भिवंडीत कागदी रोलच्या गोदामाला भीषण आग
मागील अनेक महिन्यांत संजय गांधी राष्ट्रीय उद्याणाच्या संरक्षण भिंतीच्या आसपास असलेल्या मानवी वस्तीत अनेकवेळा बिबट्याने दर्शन झाले. तर, काही वेळा तर बिबट्या रात्री आला आणि गेला. मात्र, त्याचे दर्शन हे सीसीटीव्हीच्या माध्यमातून घडले. आठवड्यापूर्वीच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डन या सोसायटीमधील नागरिकांना पहाटेच्या सुमारास बिबट्या दिसून आला. त्यानंतर परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते. मात्र, बिबट्या रात्री मानवी वस्तीत वावर करतो आणि पळून जातो. दरम्यान शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास चक्क दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन हे घोडबंदर रोडवरील पारिजात गार्डनमधील रहिवाशांना झाले आणि एकच थरकाप उडाला. नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.