महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याणमध्ये गावगुंडांचा राडा; दहशत माजवण्यासाठी घरसामानासह वाहनांची तोडफोड - कोळसेवाडी पोलीस स्टेशन

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डझनभर स्थानिक गावगुंडाकडून लूटपाट आणि परिसरातील उभ्या असलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आली.

crime
ठाणे

By

Published : Nov 17, 2020, 8:28 PM IST

Updated : Nov 17, 2020, 10:13 PM IST

ठाणे - कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डझनभर स्थानिक गावगुंडाकडून लूटपाट आणि परिसरातील उभ्या असलेल्या सहा वाहनांची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुंडांची शोधमोहीम सुरू केली आहे. कल्याणमध्ये सोमवारी बंदूकीचा धाक दाखवत ज्वेलर्स दुकानदाराला लुटल्याची घटना घडली. या घटनेला चार तास उलटत नाही तोच ही दुसरी घटना घडल्याने कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

कल्याणमध्ये गावगुंडांचा राडा

गावगुंडांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिल्याने घरात घुसून लुटपाट

कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात राहणारे रवी म्हात्रे आणि त्यांची पत्नी लता म्हात्रे हे पार्किंगचा व्यवसाय करतात. त्याठिकाणी त्यांची वडापावची गाडीही आहे. सोमवारी रात्री काही स्थानिक तरुण या परिसरात एका आईसक्रीमवाल्याकडून जबरदस्तीने पैसे मागत होते, असा आरोप आईसक्रीम चालक कैलास तेली यांनी केला आहे. तेली यांनी मदतीसाठी बाजूला उभ्या असलेल्या लता म्हात्रे यांना आवाज दिला. लता म्हात्रे यांनी पैसै उकळणाऱ्या तरुणांना विरोध केला. या प्रकरणी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून रात्रीच्या वेळी दहा ते पंधरा गावगुंडांनी म्हात्रे यांच्या घरात घुसून हल्ला केला. घरातील सामानाची तोडफोड केली. घरात काही दागिने आणि रोकड होती. तिही या दरम्यान गुंडांनी लुटून नेली. इतकेच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या टेम्पो, मारुती व्हॅन, जीप, रिक्षा, आदी सहा गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. या घटनेमुळे पीडित कुटुंब आणि परिसरातील नागरिक दहशतीखाली असून पोलिसांनी या प्रकरणात ठोस कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

कठोर कारवाई करणार - पोलीस

काही तरुणांनी पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिले नाही म्हणून रागात गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची तक्रार दाखल झाली आहे. चौकशीअंती दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांनी सांगितले. मात्र, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदिवली परिसरातील ज्वेलर्सला बंदूकीचा धाक दाखवून लुटण्याची घटना सोमवारी घडली असतानाच या घटनेच्या चार तासाच्या अवधीनंतर तोडफोडीची दुसरी घटना कल्याणमध्ये घडली आहे.

हेही वाचा -माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम, उमेदवारी डावलल्याने निर्णय

हेही वाचा -एकनाथ शिंदे झाले पदवीधर.. नाशिक मुक्त विद्यापीठाच्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचे निकाल जाहीर

Last Updated : Nov 17, 2020, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details