ठाणे - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू केले आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दर शनिवारी आणि रविवारी दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र व्यापाऱ्यांनी आयुक्तांच्या आदेशाला न मानता दिलेले आदेश मागे घ्या, अशी मागणी करत २७ मार्च रोजी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात काही व्यापाऱ्यांनी तोंडावर मास्क परिधान केले नव्हते. तर सामाजिक अंतराचे पालन केले नव्हते. त्यामुळे कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापाऱ्यांवर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे व्यापाऱ्यांवर विविध कलमा नुसार दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
नियमाचा भंग करणाऱ्या १२५ आंदोलनकर्त्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
कोरोना नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पाटील यांच्या फिर्यादीवरून आंदोलनकर्त्या १२५ व्यापाऱ्यांवर डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे व्यापाऱ्यांवर विविध कलमा नुसार दाखल करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
‘या’ कारणामुळे झाले होते ठिय्या आंदोलन
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीत अत्यावश्यक वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश केडीएमसी प्रशासनाने दिले आहेत. मात्र या आदेशांवर कल्याण डोंबिवलीतील व्यापारी आणि दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोना केवळ आमच्याच दुकानातून पसरतो का? आणि दुकाने बंद ठेवली तर आम्ही जगायचे कसे? असे संतप्त सवाल करत कल्याण डोंबिवलीमध्ये व्यापारी रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवार या दोन दिवशीच आमचा व्यवसाय होत असतो आणि केडीएमसी प्रशासनाने नेमके याचदिवशी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने आम्ही काय करायचे? आमच्या दुकानात काम करणाऱ्यांचा पगार, लाईट बिल, टॅक्स आम्ही कसा भरणार? दुकाने बंद ठेवण्यास लावून केडीएमसी आम्हाला आर्थिक मदत करणार का? यासारखे अनेक संतप्त सवाल या व्यापाऱ्यांनी उपस्थित केले होते.