ठाणे : शहापूर तालुक्यातील वेहळोली (बु.) ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील लिंगायतपाडा (Lingayatpada in Thane district) येथे स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे भरपावसात मृतदेहावर ताडपत्री पकडून अखेरचे अंत्यसंस्कार (No cemetery at Lingayatpada) करावे लागत असल्याचे उघडकीस आले आहे. स्मशानभूमीच्या दुरावस्थेमुळे सोसाव्या लागत असलेल्या गैरसोयीमुळे येथील गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दुरुस्तीचा लाखो रुपये निघी जातो कुठे? :
लिंगायतपाडा येथील गोविंद कमळु वेखंडे व शंकर कमळु वेखंडे या दोघा भावांचे अवघ्या एक दिवसांच्या अंतराने निधन झाले. शहापूर तालुक्यात सध्या पावसाचा जोर असल्याने व डोक्यावर छप्पर असलेली सुरक्षित स्मशानभूमी नसल्याने गावातील जेष्ठ नागरिकांच्या निधनाने या दोन्ही घटनांच्या वेळी स्मशानभूमीची दुरावस्था प्रकर्षाने उघडकीस आली. ठाणे जिल्हा परिषदेने संपूर्ण ५ वर्षात नवीन शाळा बांधणे व शाळा दुरुस्ती तसेच नवीन स्मशानभूमी बांधणे व स्मशानभूमी दुरुस्ती करणे, या मुलभूत जनसुविधेच्या योजनांसाठी शहापूर तालुक्यात लाखो रुपयांचा निधी खर्च केला आहे. तरीही लिंगायतपाड्यासारखी लोकवस्ती स्मशानभूमीच्या मुलभूत सुविधेपासून वंचित राहिली आहे. याचे आश्चर्य आणि संतापही व्यक्त केला जात आहे.