ठाणे - भिवंडी शहरात आतापर्यंत विदेशवारी करून आलेले ३० व्यक्ती आढळून आल्याने त्यांना क्वारंटाईन केंद्रात न ठेवता त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला महानगरपालिका आरोग्य विभाग देत आहे. मात्र, अशा व्यक्ती समाजात खुलेआम वावरत असल्याचे आढळून आल्याने शहरात या विषाणूचा अधिक प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना त्यास आळा घालण्यासाठी विदेशवारी करून आलेल्या व्यक्तीस अलगिकरण केंद्रात ठेवून त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यातच भिवंडी शहरात तब्बल तीस व्यक्ती परदेशी जाऊन आल्याचे महानगरपालिका सूत्रांकडून समजले आहे. मात्र, अशा व्यक्तींना केवळ होम क्वारंटाईन करून राहण्याचा सल्ला भिवंडी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिला जात असल्याचे उदारण समोर आले आहे.
भिवंडीत 'होम क्वारंटाईन' संशयितांची सर्व सामान्य नागरिकांना भीती... रविवारी रात्रीच्या सुमाराला कामतघर-हनुमाननगर या भागात कतार देशातून शनिवारी आलेला एक व्यक्ती आढळून आला. त्याची माहिती आरोग्य व पोलीस विभागास दिल्यावर त्या व्यक्तीची केवळ तपासणी व माहिती घेऊन त्यास होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देऊन सोडून दिले. मात्र, तो राहत असलेला परिसर दाटीवाटीचा व झोपडपट्टी विभाग असल्याने त्या ठिकाणी तो असा बंदिस्त राहू शकत नाही. अशा संशयित रुग्णांच्या माध्यमातून विषाणूचा फैलाव होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा...महाराष्ट्रातील सहा विद्यार्थी मॉरिशसमध्ये अडकले; मदत करण्यासाठी अशोक चव्हाणांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
तीन दिवसांपूर्वी दुबईतुन एक युवक आला असता त्यालाही होम क्वारंटाईन सल्ला दिला होता. तरिही तो परिसरात वावरत आहे. तसेच मित्रांसोबत जेवणाची पार्टी करायला धाब्यावर गेला होता. त्याला ताप आला असल्याची माहिती महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकारी राजेंद्र वरळीकर यांना कळताच त्यांनी महापौर प्रतिभा पाटील यांना कळवून त्या माध्यमातून महानगरपालिका आरोग्य अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णास ताब्यात घेऊन त्याची रवानगी भिवंडी-कल्याण रस्त्यावरील क्वारंटाईन केंद्रात केली आहे.
शहरात सुमारे तीस नागरिक विदेशवारी करून आलेले आढळून आले असताना महानगरपालिका आरोग्य विभाग त्यांना क्वारंटाईन केंद्रात न ठेवता होम क्वारंटाईन ठेवण्याचा निर्णय घेत आहे. मात्र सध्या घरात राहून शासनाच्या प्रयत्नांना साथ देणाऱ्या नागरिकांकडून भीती व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोना विषाणूचा शिरकाव थोपवण्यासाठी अशा व्यक्तींना क्वारंटाईन केंद्रात हलवून त्यावर आरोग्य विभागाने लक्ष ठेवणे गरजेचे असताना महानगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग त्या बाबत खबरदारी घेत नसल्याबद्दल नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा...संचारबंदी असतानाही घराबाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांच्या दंडुक्यांचा प्रसाद
होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्ती स्वतः जबाबदारी घेऊन वागत नसून ते समाजात खुलेआम फिरत या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव करू शकतात. त्यात सुदैव म्हणजे भिवंडी शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला नसून होम क्वारंटाईन व्यक्ती निष्काळजीपणा करीत असतील तर ते समाजाचे गुन्हेगार आहेत, अशी भावना अनुष्का भोईर या तरुणीने व्यक्त केली आहे.