नवी मुंबई - शहरात दिवसागणिक कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचे झपाट्याने वाढणारे रुग्ण पाहता नवी मुंबईची हजार रुग्णसंख्येकडे वाटचाल सुरू आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण हे 'एपीएमसी' बाजार समितीमध्ये कार्यरत व्यापारी वर्ग आहे. वाढते कोरोना रुग्ण पाहता 11 ते 17 मे या कालावधीत मार्केट बंद करण्यात येऊन मार्केटमध्ये निर्जंतुकीकरण व व्यापारी व कामगार वर्गाची कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे. आज झालेल्या तपासणीसाठी जमलेल्या व्यापारी, दलाल व कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारची विनंती करूनही सुरक्षित अंतर न राखल्याने अखेर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कोविड-19 चाचण्या थांबवाव्या लागल्या.
सुरक्षित अंतर न राखल्याने नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील कोरोना चाचणी थांबवली - Corona test stopped apmc new mumbai
तपासणीसाठी जमलेल्या व्यापारी, दलाल व कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारची विनंती करूनही सुरक्षित अंतर न राखल्याने अखेर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कोविड-19 चाचण्या थांबवाव्या लागल्या.
नवी मुंबईमध्ये एपीएमसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कोरोना पसरत आहे. एपीएमसीमध्ये कार्यरत व्यापारी कर्मचारी त्यांचे निकटवर्तीय मिळून आतापर्यंत सुमारे अडीचशे लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाजार समितीमध्ये कोरोना आणखी बळावू नये, म्हणून 11 ते 17 मे या सात दिवसाच्या कालावधीत बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान बाजारसमितीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले, तसेच बाजार समितीमधील व्यापारी, कामगार, माथाडी, मापाडी, दलाल यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमधून व्यापारी व ग्राहक स्क्रीनिंगसाठी दाखल झाले. हे सर्व विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार भाजी मार्केटमध्ये महापालिका आरोग्य विभागाच्या माध्यमातून 150 लोकांची चाचणी करण्यात आली. मात्र, धान्य मार्केटमध्ये या चाचणी दरम्यान त्रेधातिरपीट उडाली.
"ग्रोमा"व्यापारी संघटनेच्या माध्यमातून दाना मार्केटमध्ये कार्यरत व्यापारी, ग्राहक, दलाल, कामगार यांना चाचणीसाठी बोलविण्यात आले होते, तसेच जे व्यापारी या चाचणीसाठी येणार नाहीत त्यांना 17 तारखेनंतर मार्केट उघडल्यावर प्रवेश मिळणार नाही, असा फतवा ग्रोमाच्या माध्यमातून काढण्यात आला. त्यामध्ये बऱ्याचशा व्यापाऱ्यांनी या अगोदरही कोविड-19 ची चाचणी केली होती. मात्र, ग्रोमाच्या अजब फतव्यामुळे व्यापारी, दलाल कामगार यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आणि कोणत्याही प्रकारचे सुरक्षित अंतर पाळले नाही आणि ही गर्दी पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. एपीएमसीमधील सुरक्षा कर्मचारी पोलीस, यांनी सोशल डिंस्टन्सिंग पाळण्याची विनंती करूनही व्यापारी वर्गावर काहीही परिणाम झाला नाही व परिस्थिती जैसे थे होती. त्यामुळे अखेर डॉक्टर व महापालिकाच्या आरोग्य विभागाला संबधित गर्दी पाहून कोरोनाची चाचणी बंद करावी लागली.