ठाणे - कोरोना पुन्हा डोकं वार काढू लागल्याने ठाणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या एक हजाराच्या घरात पोहचली आहे. ठाणे जिल्ह्यात चक्क चौथी लाट येणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डॉ. कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे कोरोनामुळे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेला सामोरे गेल्यानंतर अखेर कोरोनाचे सावट कमी झाले होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र, काही दिवसांपासून कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागला आहे. सध्या ठाणे जिल्ह्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ९९२ वर येऊन पोहचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात १९८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. सध्या आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त हे ओमायक्रोन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता ठाणेकरांची चिंता वाढली आहे.
निर्बंध कडक होण्याची शक्यता -ठाण्यात २३ मे पासून पुन्हा रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. २३ मे रोजी ठाणे जिल्ह्यात २१ कोरोनाबधित रुग्ण संख्या तर १७२ सक्रिय रुग्ण होते. मात्र हीच संख्या आता १९८ कोरोनाबाधित आणि ९९२ सक्रिय रुग्णांवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे चौथी लाट सदृश्य परिस्थिती तयार होऊ लागली आहे. जर रुग्ण संख्येत अशाच प्रकारे झपाट्याने वाढ होऊ लागली तर ठाणे जिल्ह्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेप्रमाणे पुन्हा निर्बंध कडक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उपाययोजना सुरू -ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यावर उपाययोजना म्हणून ठाणे महापालिकेकडून लसीकरणावर पुन्हा जोर देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेकडे मोठ्या प्रमाणात लसचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घ्यावा तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क आणि सॅनिटाइजरचा वापर करावा असे आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकिस्तक डॉ. कैलाश पवार यांनी केले आहे. ठाणे महानगर पालिकेकडून ठाणेकरांसाठी ठाण्यातील शासकीय रुग्णालयात लसीकरणात वाढ करून बूस्टर डोस देण्यासाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
हेही वाचा -Minister Rajesh Tope : कोरोनाचे सावट असले तरी वारी होणारच; आरोग्यमंत्र्यांची माहिती