ठाणे - इस्त्राइल देशाचे कौन्सिल जनरल कोभी सोसिणी यांनी आज शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केली. इस्त्राइल व भारत यांचा कृषी धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न भविष्यात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
इस्त्राइली ग्रामविकासाच्या संकल्पनेतून शेतीचा मानस
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात भाताचे कोठार समजल्या जाणाऱ्या आवरे, आठगाव, कलमगाव, दहिगाव या गावांना इस्त्राइलच्या शेतीविषयक धोरण कौन्सिल जनरल कोभी सोसिणी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी बांधावर जाऊन शेतीची पाहणी केली. इस्त्राइल आणि भारत यांच्या एकत्रित प्रयत्नातून इस्त्राइल ग्रामविकासाच्या संकल्पना येथे राबवता येतील का, याचाही अभ्यास केला.
दोन गावे दत्तक घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग
स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ठाणे जिल्हापरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शहापूर तालुक्यातील दोन गावे दत्तक घेऊन शेतीत नवनवीन प्रयोग या गावांत राबविणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे या गावांमध्ये इस्त्राइली ग्रामविकासाची संकल्पनादेखील राबविण्यात येणार आहे. यामुळे शहापूर तालुक्यातील दोन दत्तक गावे विकासाची मॉडेल म्हणून पुढे येतील. यातून इस्त्राइल व भारत यांच्या कृषी धोरणामध्येही आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न भविष्यात होणार आहे. या संपूर्ण दौऱ्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषद व शहापूर पंचायत समितीमार्फत करण्यात आले होते.