ठाणे :लसीकरणात अधिक सुसूत्रता येण्यासाठी ठाण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी अनोखी शक्कल लढविली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना दररोज वयोगटानुसार वेगवेगळ्या रंगाचे कुपन ठाण्यात दिले जाणार आहे. जेणेकरून कुपनचा पुन्हा वापर टाळून लसीकरणासाठी नागरिकांचा त्रासही कमी होण्यास मदत होणार आहे.
कलर कोड कुपन सिस्टमनुसार होणार ठाणेकरांचे लसीकरण - ठाणे लसीकरण
वयोगटानुसार उपलब्ध असलेल्या लसींचा साठा बघून पिवळा, हिरवा, केशरी, गुलाबी, पांढरा, आणि निळा अशा सहा रंगाचे कुपन आता दरदिवशी बदलून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर दिवशी हे कुपन वयोगटानुसार बदलून देण्यात येणार आहे. जेणेकरून आज घेतलेले कुपन हे दुसऱ्या दिवशीच्या वयोगटाला साम्य होणार नाही आणि लसीकरणासाठी सुसूत्रता देखील निर्माण होईल व नागरिकांची गर्दी देखील कमी होईल असे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार म्हणाले.
लसीकरणात सुसूत्रता येण्याची अपेक्षा
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. मात्र लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणात खंड पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यावर तोडगा म्हणून ठाण्यात लसीकरणासाठी कलर कुपनची सिस्टीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यातील त्रुटी समोर आल्यानंतर या सिस्टीममध्येही आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता या नव्या सिस्टीममुळे लसीकरणात सुसूत्रता येण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.