ठाणे - उल्हासनगर महापालिका प्रभाग क्रमांक ७ मधील नागरी सुविधांच्या अभावामुळे अनेक नागरी समस्या आ वासून उभ्या राहिल्या आहेत. विशेष म्हणजे तेही खुद्द उपमहापौरांच्या प्रभागातच दिसून आल्याने मग तर बाकीच्या प्रभागात काय अवस्था असले. याचा विचार न केलेला बराच, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. किमान मूलभूत नागरी समस्यांकडे उपमहापौरांनी लक्ष देऊन त्या समस्या मार्गी लावण्याची मागणी यावेळी केली आहे.
रस्तात खड्डे की खड्यात रस्ते; तर गटारी तुडुंब भरलेल्या अवस्थेत-
उल्हासनगर शहरात मागील अनेक वर्षांपासून नागरी समस्याबाबत कायमच नागरिकांची ओरड असते. त्यातच उपमहापौरांच्या प्रभागात तर नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या प्रभागातील रमाबाई आंबेडकर नगर ते हनुमान नगरपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे रस्तात खड्डे की खड्यात रस्ते, अशी अवस्था झाली आहे. तर रस्त्यात जागोजागी खड्डे पडले असून त्या खड्ड्यात पाणी साचून अपघात ही घडत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे.
उपमहापौरांच्या प्रभागातच नागरी समस्यांचा विळखा विशेष म्हणजे नागरिकांना पिण्यासाठी पाण्याची टंचाई असली तरी रस्त्यावर मात्र चोवीस तास पाणी वाहत असते. गटारी तुडुंब भरलेल्या अवस्थेत असून कधी तरी साफसफाई झाली आहे का, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे. प्रभागातील अनेक गटारी कोलमडून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यातील सांडपाणी रस्त्यावर बारमाही वाहत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना समस्या भेडसावत असून मात्र उपमहापौरच याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे.
याच प्रभागातून उपमहापौरसह सभापतीही सत्तेत-
या प्रभागातून गेल्या चार वर्षापूर्वी चार नगरसेवक निवडून आले आहेत. तरी नागरिक समस्या मात्र जैसे थेच असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. याच प्रभागातून उपमहापौर आणि सभापती हेही सत्तेत सहभागी आहेत. तरीसुद्धा प्रभागात दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आता निवडणूकीला अवघे एक वर्ष शिल्लक असून आता तरी नागरी समस्या दूर होतील का?, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. या बाबत उपमहापौर भगवान भालेराव यांच्याशी संर्पक साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा-कोरोनाची वाढती रुग्ण संख्या चिंतेची बाब - राजेश टोपे