ठाणे - कधी पावसामुळे तर कधी तांत्रिक अडचणींमुळे ठाणेकरांच्या प्रवासाचे हाल होतात. मात्र, बुधवारी एका तरुणामुळे मध्य रेल्वेची सेवा तब्बल एका तासासाठी विस्कळीत झाली होती.
खांबावर चढलेल्या मनोरुग्णामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एका तासासाठी खोळंबली
दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी एक तरुण ठाणे रेल्वे स्थानकावरील स्लो ट्रॅकवरील ओव्हर हेड वायर खांब क्रमांक ३२/२० एम वर चढला होता. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक एक तासासाठी बंद करण्यात आली होती.
दुपारी ४ वाजून ५० मिनिटांनी एक तरुण ठाणे रेल्वे स्थानकाजवळच स्लो ट्रॅकवरील ओव्हर हेड वायरच्या खांब क्रमांक ३२/२० एमवर चढला होता. घटना स्थळावरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे लोहमार्ग पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटना स्थळी दाखल झाले. यानंतर सुरुवातीला मुंबई ते कल्याण धिम्या रेल्वे मार्गावरील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. आणि १०-१५ मिनिटांच्या मेहनतीनंतर या तरुणाला खांबावरून खाली उतरवण्यात आले. यामुळे एक तास मुलूंड ते कल्याण धिम्या ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
खांबावर चढलेला तरुण हा झारखंड राज्यातील सिमदेगा जिल्ह्यातील कुंदूरमुंडा या गावाचा रहिवाशी असून त्याचे नाव मंगल रामपाल यादव असे त्याने सांगितले आहे. जवळपास ३ आठवड्यांपूर्वी हा तरुण गीतांजली एक्स्प्रेसने ठाण्यात त्याच्या सहकाऱ्यांसोबत कामाकरीता आला होता. मात्र, यापुढचे त्याला काहीही आठवत नसल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. प्राथमिक चौकशीत हा तरुण मनोरुग्ण असल्याचे समोर आले होते. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर हा तरुण मनोरुग्ण नसून तो काम न मिळाल्यामुळे असे वागला असावा, अशी माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.