नवी मुंबई- महाराष्ट्रात सर्वत्र संचारबंदी लागू आहे मात्र भाजप नगरसेवक आणि नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते रवींद्र इथापे बेलापूर येथील पारसिक हिलवर मित्रांसोबत मार्निंग वॉक करत होते. याप्रकरणी इथापे यांच्यासह 17 जणांवर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी पनवेलमधील भाजप नगरसेवक अजय बहिरा यांनी आपल्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्यावरही पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधीच नियमांची पायमल्ली करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Lockdown: मित्रांसोबत मार्निंग वॉक करणे पडले महागात; भाजप नगरसेवकासह 17 जणांवर गुन्हा दाखल - कोरोना
पारसिक हिल येथे नगरसेवक रवींद्र इथापे यांच्यासह मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नगरसेवकाला पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने चांगलाच झटका बसला आहे.
सरकार,आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत असतानाचं काही लोकप्रतिनिधीच नियमांची पायमल्ली करत केराची टोपली दाखवत असल्याचे चित्रंनवी मुंबई व पनवेलमध्ये दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरु असताना भाजपचे नगरसेवक व नवी मुंबई मनपाचे सभागृह नेते रवींद्र इथापे बेलापूर येथील पारसिक हिलवर काल आपल्या मित्रांसोबत अवैधरीत्या मार्निंग वॉक करत होते.याबद्दल सीबीडी बेलापूर पोलिसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते पोलीस पथक घेऊन पारसिक हिल येथे पोहोचले व नगरसेवक रवींद्र इथापे यांच्यासह मॉर्निंग वॉक करणाऱ्या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले. या प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात लॉकडाऊन आणि जमावबंदी असतानाही मित्रांसोबत मार्निंग वॉक करणाऱ्या भाजप नगरसेवकाला पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने चांगलाच झटका बसला आहे.
नवी मुंबईत दिवसागणिक कोरोनाचा प्रादुर्बाव वाढत असताना नागरिकांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. एपीएमसीही बाजार बंद ठेवण्यात आला आहे तसेच सायंकाळी पाचनंतर शहरातील मेडिकल वगळता सर्व किराणा दुकान बंद ठेवण्यात येत आहेत तसेच संध्याकाळी पाच नंतर बाहेर पडण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे व महानगरपालिका आणि पोलिसांच्या वतीने नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे.