ठाणे -लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी (दि. 11) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. राज्यभर महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे नेते व कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. या दरम्यान रिक्षाचालकांना दमदाटी व मारहाण केल्या प्रकरणी उपमहापौरांच्या पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी राज्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. राज्यात विविध ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षाचे नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून बंदचे आवाहन करत होते. त्यावेळी ठाणे महापालिकेच्या उपमहापौर पल्लवी कदम यांचे पती पवन कदम हे रिक्षाचालकांना दमदाटी करत होते. त्यांच्याच उपस्थितीत माजी नगरसेवक गिरीश राजे हे रिक्षाचालकांच्या कानशिलात लगावत होते. तसेच काही शिवसैनिक रिक्षाचालकांना दमदाटी करून प्रवासी उतरवून घरी जा म्हणत होते. याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरलही झाला होता. मनाईचे आदेश असतानाही प्रतिबंधक आदेशाचा भंग करून रिक्षाचालकांना धमकावून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.