ठाणे- संततधार पाऊस सुरू असल्याने एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅब तिसऱ्या मजल्यावर कोसळला आहे. तर, दुसऱ्या घटनेत इमारतीची संरक्षण भिंत वालधुनी नदीत कोसळल्याची घटना उल्हासनगर येथे घडली आहे. दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला तर, दुसऱ्या घटनेत संरक्षण भिंत कोसळली - वालधुनी
पहिल्या घटनेत दुरुस्ती करतानाच चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला कोसळला. दुसर्या घटनेत पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने ही भिंत वाल दरीच्या पात्रात कोसळली.
पहिल्या घटनेत उल्हासनगर कॅम्प नंबर-२ येथील झुलेलाल मंदिरच्या बाजूला 'हम लोग' ही ४ मजल्याची धोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तिसरा मजला खाली करण्यात आला होता. दुरुस्ती करतानाच चौथ्या मजल्याचा स्लॅब अचानक तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमाराला कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही.
दुसर्या घटनेत कल्याण अंबरनाथ रोडवरील उल्हासनगरच्या शांती नगरीतील प्रवेश दाराजवळ रिजन्सी निर्माण हे भव्य गृहसंकुल उभारण्यात आले आहे. या संकुलाची संरक्षण भिंत अगदी वालधुनी नदीच्या काठाजवळ बांधलेली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसाने ही भिंत वाल दरीच्या पात्रात कोसळली. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.