ठाणे- कोरोनामुळे नातीगोती आणि माणुसकीचे खरे वास्तव अनेकांना अनुभवयास मिळत आहे. कोरोनाच्या धास्तीने इतर आजारांमुळे मृत्यू झालेल्यांची हेटाळणी होत आहे. ठाण्यात शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक समाजसेवकांनी पदरमोड करत सरकारी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातलग व निकटवर्तीयांनी पाठ फिरवली. तर सख्या भावाने मृतदेह न स्वीकारता मृताच्या घराचा ताबा घेत परस्पर काढता पाय घेतला. गेले चार दिवस अंत्यसंस्काराच्या प्रतिक्षेत हा मृतदेह कळवा रुग्णालयात खितपत पडला आहे.
कोरोनामुळे मृत्यू नसतानाही भावाचा मृतदेह घेण्यास नकार; चार दिवसांपासून डेडबॉडी ठाण्यातील शवागारात - ठाणे कळवा रुग्णालय
ठाण्यात शारीरिक व्याधीने त्रस्त असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीचा मृतदेह गेल्या चार दिवसांपासून कळवा रुग्णालयात पडून आहे. मात्र, त्याचे नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी पुढे येत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठाणे पूर्वेकडील पारशीवाडीतील बाळ सराफ चाळीनजीकच्या घरात सुरेश शेडगे हे (५८ वर्ष) गृहस्थ एकटेच राहत होते. खासगी बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेडगे यांना कंबरेच्या खाली शारीरिक व्याधी जडली होती. हा आजार बळावल्याने ते घरातच तडफडत होते. याची माहिती मिळताच १७ जूनला मध्यरात्री काँग्रेसचे कार्यकर्ते कृष्णा भुजबळ यांनी तात्काळ धाव घेऊन शेडगे यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ हलवले. परंतु, कोरोना नसतानाही उपचारादरम्यान १८ जूनला पहाटेच्या सुमारास शेडगे यांचा मृत्यू झाला.
रुग्णाच्या मृत्यूची माहिती मिळताच पुन्हा कृष्णा भुजबळ यांनी रुग्णालय गाठून मृत शेडगे यांचे भाऊ, जावई व नातलगांना कळवले. मात्र, सर्वांनीच पाठ फिरवली. अखेर, महाड येथील सख्या भावाला, मृताच्या नावावर घर असल्याचे कळवताच घराच्या लोभाने रुग्णाचा भाऊ ठाण्यात आला. परंतु, रुग्णालयातून शव ताब्यात घेण्याऐवजी त्या भावाने मृताच्या घराला कुलूप लावून परतीची वाट धरली. वारंवार फोन करूनही कुणीही नातलग येत नसल्याने मृत शेडगे यांचे शेजारी-पाजारी संतापले आहे. सख्खा भाऊदेखील जबाबदारी स्वीकारायला तयार नसल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. तर शेडगे यांचा मृतदेह गेल्या चार दिवसांपासून कळवा रुग्णालयातील शवागारातच बेवारस स्थितीत पडून असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.