महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू; हळदीला आलेल्या 90 पाहुण्यांची चाचणी, गाव कन्टेन्मेंट क्षेत्र जाहीर - नेरे गाव कन्टेन्मेंट क्षेत्र जाहीर

पनवेल तालुक्यातील नेरे गावात 14 जून रोजी लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर 23 जून रोजी नवरदेवाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे.

Nere village declared containment area
नेरे गाव कन्टेन्मेंट क्षेत्र जाहीर

By

Published : Jun 27, 2020, 6:32 PM IST

नवी मुंबई -जागतिक साथरोग असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी राज्यात आणि देशभरात सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लग्नसोहळा, बैठका, सभा आयोजित करण्यास बंधने घालण्यात आली आहेत. एकीकडे 50 पेक्षा अधिक लोक लग्नसोहळयास उपस्थित राहू नये, सॅनिटाझर, मास्क लावून आणि दोन व्यक्तीत आवश्यक अंतर राखून, लग्नसोहळे करण्यात यावेत, असे शासनाने नियमावलीत जाहीर केले असतानाही, पनवेल तालुक्यातील नेरे गावात एका कुटुंबाने प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवून 14 जूनला मोठ्या धुमधडाक्यात हळद साजरी केली.

नवी मुंबई परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांची प्रतिक्रिया

पनवेलमध्ये छुप्या पद्धतीने सर्व नियम पायदळी तुडवून नेरे गावात झालेला हा हळदी सोहळा चांगलाच गाजला आहे. याचे कारण सोहळ्यानंतर अवघ्या काही दिवसात नवरदेवाच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरदेवाचा भाऊ आणि नवरीचे वडील यांच्यावर साथीचा रोग प्रादुर्भाव, आपत्कालीन कायद्याचे उल्लंघन करणे, अशा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर नेरे गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.

हेही वाचा...मुंबईत 'प्लाझ्मा' थेरपी यशस्वी; नायर रुग्णालयातील 15 रुग्णांची कोरोनावर मात

कोरोनाचा संसर्ग झालेला नवरदेवाच्या भावाने या हळदीत सहभाग घेतला होता. लग्न समारंभ पार पडल्यानंतर 23 जूनला त्याचा कोरोनाने मृत्यू झाला तसेच त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हळदी समारंभात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनामुळे ग्रामपंचायत सदस्य असलेल्या नवरदेवाच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस प्रशासन देखील जागे झाले आहे.

आपत्कालीन परिस्थिती कायद्याचे उल्लंघन, साथरोग प्रतिबंध आणि भारतीय दंडविधान कलम अंतर्गत नवरदेव, नवरदेवाचे वडील, नवरीचे वडील यांच्या विरोधात पनवेल तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सोहळ्याला 500 पेक्षा अधिक लोक सहभागी झाले असल्याचे सांगितले जात आहे. हळद आणि लग्न सोहळ्यात काढलेले फोटो मिळवून दोन्ही ठिकाणी किती लोक उपस्थित होते, याचा शोध घेतला जात आहे. तसेच संपर्कात आलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा...'भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 5 लाखांचा टप्पा.. तरीही मोदींचे मौनच'

या घटनेनंतर नेरे परिसर कंटेन्मेंट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात नव्वदपैकी 27 जणांची चाचणी करण्यात आली आहे. उर्वरीत लोकांची त्यानंतर चाचणी होणार आहे. या घटनेनंतर 25 जून रोजी पनवेलचे प्रांत दत्तात्रेय नवले, तहसीलदार अमित सानप आदींनी येथील परिसराची पाहणी केली. परिसरात कोणीही विनापरवाना लग्नसोहळ्यांचे आयोजन करू नये, अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details