ठाणे -ठाण्यातील इंजिनिअर अनंत करमुसे यांच्या मारहाणप्रकरणातील मुख्य सूत्रधारावर कारवाई करावी. तसेच या प्रकरणात अटक केलेल्या तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे भाजपने केली आहे. भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच त्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कारवाईची मागणी केली.
ठाण्यातील एका मंत्र्यांच्या निवासस्थानी अनंत करमुसे यांना ५ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनीच करमुसे यांना घरातून नेले होते. या प्रकरणात सुमारे ६ महिन्यांनंतर पोलीस शिपायांना अटक करण्यात आली. मात्र, अद्यापि या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधारावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तसेच त्याची चौकशीही करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजपने आज पोलीस आयुक्तांना निवेदन दिले.