ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भिवंडी शहराच्या मध्यभागी असलेल्या महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला भिवंडी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची रोषणाई, सुशोभीकरण केली नाही. मात्र, कोणार्क विकास आघाडीच्या महापौर प्रतिभा पाटील यांनी महापौर चषकात लाखो खर्च करून भव्य लेझर फायरची रोषणाई केली. त्यामुळे भाजप युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर महापौरांचा विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.
कोरोना नियमांचे उल्लंघन करीत हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत भिवंडी महापौर चषक क्रिकेट सामन्यांचे आयोजन कसे ? असा सवाल उपस्थित करून हे क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी काँग्रेस नगरसेवक राऊत यांनी दोन दिवसापूर्वी केली होती. त्यापाठोपाठ शिवाजी चौकतील शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोरच भाजपच्यावतीने निषेध फलक लावण्यात आला.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला रोषणाई न केल्याने भाजपकडून महापौरांचा निषेध हेही वाचा-'राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगीची गरज नाही'
महापौर चषकातून गेल्या १५ वर्षांपासून नियमाची पायमल्ली करीत आयोजन होत आहे. मात्र, आज शिवरायांच्या जयंती दिनी त्यांच्या पुतळ्याला कुठल्याही प्रकारची रोषणाई अथवा सुशोभीकरण करण्यात आले नाही. आजही लाखो रुपयांची रोषणाई करून महापौर चषकाचे सामने सुरू असल्याचे भाजप ठाणे जिल्हा युवा आघाडी उपाध्यक्ष भावेश सुनिल पाटील यांनी सांगितले. पालिका प्रशासन व महापौरांना महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ रोषणाईचा विसर पडल्याने भाजपचे ठाणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष भावेश सुनिल पाटील यांनी प्रशासन व महापौरांचा निषेध केला. यावेळी विशाल डुंबरे, वैभव भाऊ काठवले, संदीप सावंत यांच्यासह भाजपचे युवा आघाडीचे कार्यकर्त्यांनी महापौरांचा निषेध केला.
हेही वाचा-चक्क ट्रॅक्टर स्वार होऊन नवरी पोहचली मंडपात; शेतकरी आंदोलनाला दिला पाठिंबा
भिवंडी महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपचाही समावेश आहे. कोणार्क विकास आघाडीच्या महापौरांचा शिवरायांच्या जयंतीलाच जाहीर निषेध केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.