ठाणे -महाविकासआघाडी सरकारविरोधात भाजपने राज्यभर 'एल्गार' आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. ठाणे शहरातील भाजपचे शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.
ठाणे शहरात सरकार विरोधात भाजपकडून आंदोलन... शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार, तसेच शिवसेनेने ठाण्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता फसवणूक केली आदी मुद्द्यांवरून भाजपकडून निदर्शने करण्यात आली. ठाण्यातील जनतेच्या मागण्यांसाठी आगामी काळात आणखी उग्र आंदोलन करण्याचा निर्धार ठाणे शहराचे भाजपचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा...'देशात 'भारत माता की जय' म्हणणारा राहील; वातावरण खराब करणाऱ्यांवर कारवाईची वेळ'
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या निदर्शनात माजी खासदार किरीट सोमैया, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. माधवी नाईक व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते.
महाराष्ट्रातील आघाडी सरकारचे 3 महिन्यात तीन-तेरा वाजले असून हे सरकार राज्याचेही तीन तेरा करणार असल्याची टीका किरीट सोमैय्या यांनी केली. हे सरकार सत्तेला बिलगणारे आहे, असा टोला भाजप प्रवक्ते किरीट सोमैय्या यांनी लगावला.