ठाणे - जिल्ह्यातील युतीच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. यामुळे भाजपला 'झटके पे झटका' देत, भाजपच्या विद्यमान आमदारांसह २ जिल्हाध्यक्षांनी युतीच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता मोठी बंडाळी पुढे येण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार नरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया हेही वाचा - गांधी@150 : रेल्वे मंत्रालयाने दाखवले ईटीव्ही भारतचे गीत
कल्याण पश्चिमचे विद्यमान भाजपचे आमदार नरेंद्र पवार यांचा पत्ता कट करून ही जागा शिवसेनेने पदरात पाडून घेतली. तर, युती झाल्याने गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी टक्कर देणाऱ्या भाजपच्या २ जिल्हाध्यक्षांपैकी भिवंडीतील भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी समर्थकांसह काँग्रेसच्या गोटातून सामील होत, भिवंडी पूर्व मतदारसंघातून काँगेसच्या तिकीटावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
उल्हासनगर भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार कुमार अयलानी यांचे कट्टर प्रतिस्पर्धी कलानी कुटुंबाने भाजपशी घरोबा करून उल्हासनगर विधानसभा लढवण्याच्या तयारीत आहे. यामुळे माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार अयलानी गेल्या ४ दिवसांपासून बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचे दिसून आले आहे. हीच परिस्थिती अंबरनाथ मतदारसंघात दिसून अली. युतीच्या जागावाटपात अंबरनाथ पुन्हा शिवसेनेकडे दिल्याने भाजपमधून इच्छूक असलेले सुमेध भवर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत, मनसेमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. एकंदरीतच गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपचा बोलबाला पाहता विविध राजकीय पक्षातून शेकडोच्या संख्येने नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. मात्र, याही नेत्यांसह प्रमुख कार्यकत्यांची निवडणुकीत गोची होऊन बसल्याने तेही येत्या दिवसात भाजप सोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - नाशकात बाळासाहेब सानपांच्या उमेदवारीवर टांगती तलवार, 21 नगरसेवकांचे राजीनामे
युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेला सोडण्यात आल्याने विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे संतापलेल्या भाजपच्या कल्याण पश्चिमेतील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी सामूहिक राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. शिवसेनेला जागा सोडल्याच्या निषेधार्थ यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. कल्याण पश्चिम मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा - नांदेडमध्ये ट्रकने मोटारसायकलस्वारांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू
दरम्यान, नरेंद्र पवार यांच्या कार्यालयात सकाळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. भाजपमधील सर्व इच्छुक उमेदवारांची बैठक घेतली. यावेळी आमदार नरेंद्र पवार म्हणाले, पाच वर्षात अनेक विकासकामे केल्याने आणि कार्यकर्त्यांमुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. शिवसेनेला जागा सोडून प्रदेशने सर्वांवर अन्याय केल्याचा निषेध म्हणून आम्ही सामूहिक राजीनामे दिले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी सांगितले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेविरोधात स्वबळावर लढून ही जागा जिंकली. त्यावेळी अवघे दोन नगरसेवक होते. आता लोकसभेला ६८ हजाराचे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे हा शिवसेनेचा नाहीतर भाजपचाच बालेकिल्ला असल्याने पश्चिमची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
दरम्यान, आतापर्यत १८ पैकी ९ जागा शिवसेनेला तर ८ जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक ७ आमदार निवडून आले होते. तर, सेनेचे ६, राष्ट्रवादीचे ४ आणि अपक्ष १ असे बलाबल होते. यंदाच्या निवडणुकीत मोठी मुसंडी मारण्याची तयारी भाजपने सुरू केली होती. मात्र गेल्या चार वर्षात जिल्ह्यात बहुतांशी महापालिकेत शिवसेनेने यश मिळवले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे लढले, मात्र शिवसेनेला चांगले यश मिळाले, तसेच अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, शहापूर नगरपालिकेची निवडणूक, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर निवडणूक लढवलेली असताना शिवसेनेने चांगले यश मिळवले. ठाण्याच्या जिल्हा परिषदेत शिवसेनेने इतिहासात पहिल्यांदा भगवा फडकवला. त्यामुळे आधी विरोधात असलेल्या भाजपला लोकसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत सत्तेच्या वळचणीला जावे लागले आहे.