ठाणे - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत तब्बल दहा कोटी रुपये खर्च करून शहरातील मोक्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या १४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैंकी केवळ चारशेच कॅमेरे सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचाच जाब विचारण्यासाठी आज ठाणे भाजप महिला मोर्चाने थेट महापालिकेतच धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात लावलेले कॅमेरे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. ते केव्हाच बंद पडल्याने शहरातील गुन्हेगार बेफिकीर झाल्याचा आरोप भाजप महिला मोर्चा शहर अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी केला. गुन्हा घडल्यावर गुन्हेगारांच्या तपासात सर्वात महत्वाची भूमिका बजावणारे सीसीटीव्हीच जर बंद असतील तर महिलांची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचा आरोप त्यांनी केला. सदरचे बंद पडलेले कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तसे झाले नाही तर भाजप कार्यकर्त्यांतर्फे ठाणे महानगरपालिकेला घेराव घालून आंदोलन करण्याचा इशाराही पेंडसे यांनी दिला.