ठाणे -गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू असताना मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, असा थेट प्रहार भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही राणे यांनी ठाण्यात बोलताना केली.
'अनेक चुका महाविकासआघाडी सरकारने केल्या'
सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका महाविकासआघाडी सरकारने केल्या, असे राणे यांनी सांगितले. ठाण्यात भाजपाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी विरोधक आणि मराठा समाजाची पुढची भूमिका सांगितली. यावेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव ॲड. संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते.
'माविआने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत'
शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी देखील राणे यांनी केली.