नवी मुंबई -आरोग्य विभागाच्या परीक्षा वारंवार रद्द होत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष आहे. सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा. अन्यथा आम्ही आंदोलन छेडू. तसेच, या आरोग्य विभागात काही दलाल सक्रिय झाले आहेत व लाखो रुपये घेऊन काम करत आहेत. दलालांमुळे आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
हेही वाचा -ठाण्यातील बंद वॉटर पार्कमध्ये घुसली मगर
आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द
आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल, तसेच नुकसान होत आहे, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली असून पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र, या अगोदर स्वतः आरोग्य मंत्र्यांनी फेसबुकवर लाइव्ह करत परीक्षा रद्द होणार नाही, असे सांगितले होते. त्यानंतर विद्यार्थी या परीक्षेसाठी आले, त्यांचे पैसे खर्च झाल्यावर त्यांना परीक्षा रद्द झाल्याचे कळते हे अंत्यत चुकीचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पसरत आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले. तसेच, अशा गोष्टींमुळे या सरकारमध्ये नक्की काय सुरू आहे, हेच कळत नाही, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.