ठाणे- राज्यात साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर आणखी काही बलात्काराच्या संतापजनक घटना समोर येत आहेत. त्यावरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्र सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत उदासीन आहे. केवळ भाषणे ठोकण्याचे काम सरकारकडून केले जाते. त्यांच्या या असल्या कारभारामुळेच आता मुख्यमंत्री महोदयांना विचारावेसे वाटते की, 'महोदय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट् माझा' असे वक्तव्य करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना टोला लगावला. वाघ या ठाण्याच्या ब्राह्मण विद्यालयात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महिला सुरक्षेवरून चिंता व्यक्त केली.
तसेच राज्यातील महिला अत्यांचारांच्या वाढत्य घटना पाहता एकीकडे राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची सूचना केली. तर मुख्यमंत्री मात्र इतर राज्यातील अत्याचाराची आकडेवारी सांगताहेत आणि दुसरीकडे संजय राऊत विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करत आहेत. मात्र संजय राऊत यांच्यामध्ये थोबाड फोडण्याची हिम्मत असेल तर त्यांनी सरकारचे थोबाड फोडावे, असे आवाहन करत वाघ यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला.
कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत, महाराष्ट्रात महिला असुरक्षितच-
महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. ठाणे शहराची १२ लाख लोकसंख्या असताना संरक्षणाची जबाबदारी ही १४० पोलिसांवर कशी सुरक्षा होणार? अशीच परिस्थिती मुंबईची आहे. साकीनाका प्रकरणात रेल्वे पोलीस मदत करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण वास्तवात रेल्वे पोलिसांची संख्याही अवघी ३८०० एवढी आहे. त्यांचे संख्याबळ कमी असताना ते काय मदत करणार? दुसरीकडे वारंवार होनगार्डची मागणी केल्यानंतरही होमगार्ड दिले नाहीत. गृहमंत्र्यांना विचारल्यानंतर त्यांना होमगार्ड पुरविण्यात आल्याचे उत्तर मिळत आहे. डोंबिवलीत वारंवार मागणी केल्यानंतरही पोलीस ठाणे का वाढविण्यात येत नाहीत? असा प्रश्नही वाघ यांनी उपस्थित केला.