ठाणे - ठाण्यात एकीकडे आंब्यावरुन भाजप-मनसे आमने सामने असतानाच आता मुंब्र्यात पाणी प्रश्नावरून राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. गेले अनेक दिवस येथील जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच कल्याण येथे फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे त्रासात भरच पडली आहे.
रमजानच्या महिन्यात मुंब्य्रात पाणी प्रश्वावरुन भाजप-राष्ट्रवादी आमने-सामने; पाण्याचा टँकर पळवण्याचा प्रयत्न - भाजप
स्थानिक शिवसेना-भाजप नेत्यांनी खाजगी टँकर मागवून मशिदींमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करताच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी धाव घेऊन हे टँकर अडवले.
मुस्लिमधर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरु असल्याने पाणी प्रश्न आणखीनच पेटला आहे. स्थानिक शिवसेना-भाजप नेत्यांनी खाजगी टँकर मागवून मशिदींमध्ये पोहोचवायचा प्रयत्न करताच स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांनी धाव घेऊन हे टँकर अडवले. महापालिकेचे टँकर आणून आपण जनतेचे भले करत असल्याचा आव भाजप-शिवसेना करत असल्याची आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला. तर, नमाज पडायला येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपण हे खाजगी टँकर आणले असल्याचे स्थानिक भाजप नेत्या रिमा खान यांनी सांगितले.
आपणच जनतेचे कैवारी कसे आहोत हेच दाखविण्याचा प्रयत्न यातून आहे. त्याचे श्रेय लाटण्याचा पुरेपूर प्रयत्न होत होता. आपण तहानलेल्या जनतेसाठी आणलेले टँकर हायजॅक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. तर, केवळ मुस्लिमांना त्रास व्हावा म्हणून धर्मांध भाजपचा हा सगळा खटाटोप आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.