ठाणे -ठाणे शहर एकीकडे स्मार्ट सिटी असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, हेच ठाणे शहर किती स्मार्ट आहे, असा प्रश्न चिन्ह उभा राहत आहे. कारण याच ठाणे स्मार्ट सिटीत उच्चभ्रू सोसायटीत पाणीटंचाई भासत आहे आणि तिथल्या रहिवाशांना लाखो रुपये खर्च करून टँकर बोलावून पाणी घ्यावं लागत. ही ठाण्यातील भयाण परिस्तिथी आहे. याच पाणीटंचाईच्या विरोधात भाजपाच्या वतीने पुन्हा एकदा ठाणे महापालिका मुख्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला आहे. ( Bjp Agitation Against Thane Corporation over Water Issue )
शहरामध्ये मूलभूत सुविधा चांगल्या पद्धतीने असल्या तर ते शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट आहे, असं मानलं जात. मुंबई नंतर झपाट्याने वाढणारे ठाणे हे शहर ही स्मार्ट सिटी आहे. परंतु, खरी परिस्थिती वेगळी आहे. नवीन ठाणे म्हणून ओळख असलेले घोडबंदर हे उच्चभ्रू सोसायटीने वेढलेले आहे. पाऊसाची चाहूल लागली तरी या सोसायट्यांना साधं पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी येथील सोसायट्यांना लाखो रुपये देऊन टँकर बोलवावे लागत आहे. याच्याच निषेधार्थ भाजपाच्या वतीने ठाणे महापालिकेवरती हंडा मोर्चा काढण्यात आला.
ठाण्याला स्वतंत्र धरण बांधून देतो म्हणणारे सत्ताधारी नेमके गेले कुठे. निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र धरणाचे गाजर दाखवलं जाते. पण, निवडणुकीनंतर जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत, असा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला. तसेच, एकीकडे ठाण्यात बांधकाम वाढत आहे. सामान्य जनतेला पाण्यासाठी पैसे मोजावे लागतात. जर ठाणेकरांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष दिले नाही, तर भाजपा रस्ता रोको आंदोलन करेल, असा इशारा देखील संजय केळकर यांनी दिला आहे.