मीरा भाईंदर(ठाणे) - मीरा भाईंदर महानगरपालिका जवळपास पाचशे कोटींच्या कर्जात बुडालेली आहे. तसेच सार्वजनिक आरोग्या सारख्या अनेक अत्यावश्यक सेवेसाठी निधी उपलब्ध नसताना महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र शहरातील अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांवर वायफळ खर्च करण्याचा सपाटा लावला आहे. कोट्यवधी रुपयांची लूट चालवली असल्याचा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात आहे.
शहरात नवीन प्रवेशद्वारांसाठी वायफळ खर्च
मीरा भाईंदर शहरात गरज नसताना देखील स्मशानभूमी, उद्याने, प्रशासकीय इमारती, सार्वजनिक रुग्णालये अशा विविध ठिकाणी आधीची असलेली प्रवेशद्वारे तोडून त्याठिकाणी नवीन प्रवेशद्वारे बनवून करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी चालवली असल्याचा आरोप केला जात आहे. मीरा भाईंदर शहरातील परिवहन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, शालेय शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, योग्य नियोजनाअभावी योग्य ती सार्वजनिक आरोग्य सेवा देखील नागरिकांना मिळत नाही. शहराच्या कर उत्पन्नात मोठी तूट निर्माण झालेली असून निधी अभावी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतन देखील वेळेवर दिले जात नाही. अशा महानगरपालिकेवर अंदाजे पाचशे कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागात मात्र वारेमाप उधळपट्टी होत आहे. शहरातील नगरसेवक, राजकीय पक्षाचे नेते, शहर अभियंता शिवाजी बारकुंड आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खंबीत यांच्या संगनमताने अनेक आवश्यक नसलेल्या विकासकामांच्या निविदा बेकायदेशीरपणे काढल्या जात आहेत, असा आरोप केला जात आहे.